सोलापुरात धक्कादायक घटना; बापाने तिन्ही मुलांना विष पाजून आत्महत्या

सोलापूर : जिल्ह्यातील तिऱ्हे गावात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून एका तरुणाने स्वतःच्या तिन्ही मुलांना विष पाजून त्यांना मारण्याचा प्रयत्न करत स्वतः आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. भीमा अण्णा वाघमारे (वय ३४) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते एका सिमेंट कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरू होता. या वादातून पत्नी काही दिवसांपूर्वी मुलांसह माहेरी निघून गेली होती. नातेवाईकांनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्नीने सासरी परत येण्यास नकार दिल्याने भीमा वाघमारे मानसिक तणावात होते. या तणावातून त्यांनी रात्री तिन्ही लहान मुलांना वळसंगजवळील शेतात नेऊन त्यांना विष पाजले आणि त्यानंतर स्वतःही विष प्राशन केले. या घटनेत भीमा वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, तिन्ही मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, मुलांची प्रकृती गंभीर असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.