दिल्ली विमानतळावर रात्री नेमकं काय घडलं? वादळानंतर तीन विमानांबाबत मोठी माहिती समोर

राजधानी दिल्लीत रविवारी रात्री आलेल्या तीव्र वादळाचा फटका इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळालाही बसला आहे. या वादळामुळे विमानतळावरील एअर इंडियाच्या तीन विमानांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टर्मिनल-२ परिसरात पार्क करण्यात आलेल्या विमानांजवळील ग्राउंड हँडलिंग आणि इंजिनिअरिंग उपकरणे अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे नियंत्रणाबाहेर गेली. याच उपकरणांची धडक लागल्याने तीन विमानांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

दिल्ली विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार, संबंधित विमानांची सेवा तातडीने स्थगित करण्यात आली असून तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर विमानतळावरील विविध उपकरणे सुरक्षित स्थळी हलविण्याचे कामही करण्यात आले.

दरम्यान, काही खासगी विमान सेवा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी हवामानातील अचानक बदलाबाबत पुरेशी पूर्वसूचना मिळाली नसल्याचा दावा केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. एअर इंडियाने या घटनेवर अधिकृत भाष्य केले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार इतर काही विमानांनाही किरकोळ नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची सविस्तर चौकशी सुरू असून अंतिम अहवालानंतर नुकसानाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.