गावभेटीत ग्रामस्थांनी मांडल्या समस्या; खासदार प्रणिती शिंदेंनी दिली महत्त्वाची ग्वाही
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव येथे गावभेट दौरा करत ग्रामस्थांशी संवाद
साधला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी आणि मागण्या प्रत्यक्ष जाणून घेत
निवेदने स्वीकारली. गावातील पाणीपुरवठा, वीजपुरवठा, रस्ते, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच जिल्हा परिषद
शाळांशी संबंधित विविध मुद्द्यांवर ग्रामस्थांनी खासदार शिंदे यांच्यासमोर आपली
मते मांडली. यावेळी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून प्रश्न सोडविण्यासाठी
प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. ग्रामस्थांशी संवाद साधताना
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, जनतेच्या आशीर्वादामुळे
मला खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. नागरिकांच्या अपेक्षा आणि समस्या
जाणून घेण्यासाठी मी गावोगावी भेटी देत असून लोकांच्या मूलभूत प्रश्नांना
प्राधान्याने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी त्यांनी केंद्र
सरकारच्या काही धोरणांवर टीका करत वाढती महागाई, इंधन दरवाढ
आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणींचा उल्लेख केला. रस्ते, पाणी,
वीज आणि शेतकरी हिताच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणार असल्याचेही
त्यांनी स्पष्ट केले. यानंतर खासदार शिंदे यांनी बसवनगर येथे अधिकमासानिमित्त
आयोजित धार्मिक कार्यक्रमाला उपस्थिती लावून दर्शन घेतले आणि भाविकांशी संवाद
साधला. या दौऱ्यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, स्थानिक
कार्यकर्ते, ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या
संख्येने उपस्थित होते.