पावसाळ्यापूर्वी महापौरांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

आगामी पावसाळ्याच्या अनुषंगाने सोलापूर महापालिकेचे महापौर विनायक दादा कोंड्याल यांनी नीलम नगर, अक्कलकोट रोड परिसरातील नवले नगर, विनायक नगर, वज्रेश्वरी नगर आणि मुद्रा सन सिटी येथील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. मागील वर्षीच्या पावसाळ्यात या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पाहणीदरम्यान नाल्यांची स्वच्छता, पाण्याचा निचरा, नाल्यातील अडथळे तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्याच्या व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नवले नगर, विनायक नगर, वज्रेश्वरी नगर आणि मुद्रा सन सिटी परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

यावेळी वज्रेश्वरी नगर आणि मुद्रा सन सिटी परिसरातील राष्ट्रीय महामार्गालगतच्या नाल्यांचीही पाहणी करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित नाल्यांच्या कामांचा आढावा घेत पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले. संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत, असे निर्देशही महापौरांनी दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पावसाळ्याच्या काळात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, नगरसेविका सारिका खजूरगी, नगर अभियंता सारिका आकूलवार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सुनील फुलारी, महेश येमूल, उपअभियंता प्रकाश दिवाणजी, मनोज जाधव, चिंतारे, चंद्रकांत गुंडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.