मॅट्रिमोनियल साइटवरून ओळख, लग्नाचे आमिष; पुण्यात महिलेची फसवणूक

पुणे : ऑनलाईन मॅट्रिमोनियल साइटवरून झालेली ओळख एका ४२ वर्षीय महिलेसाठी धोकादायक ठरल्याची घटना हडपसर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणात प्रशांत प्रकाश चव्हाण (वय ४२, रा. फुरसुंगी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची आरोपीसोबत मॅट्रिमोनियल साइटवर ओळख झाली होती. सुरुवातीला गोड बोलणे आणि लग्नाचे आश्वासन देत आरोपीने तिचा विश्वास संपादन केला. “आपण लग्न करू” असे सांगत त्याने तिला इंदोर येथून पुण्यात बोलावले. आरोपीने तिला नोकरीचे आमिष दाखवून पुण्यात आणले आणि स्वतःच्या हॉटेलमध्ये कामाला ठेवले. त्याच ठिकाणी राहण्याची सोयही केली. चार ते पाच महिने ती त्याच्याकडे राहत होती. या काळात आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, पगाराच्या मुद्द्यावरून वाद झाल्यानंतरही आरोपी वेळोवेळी लग्नाचे आश्वासन देत राहिला. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याने अचानक लग्नास नकार दिला आणि महिलेपासून दूर राहू लागला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. मानसिक धक्का बसलेल्या महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे ऑनलाईन मॅट्रिमोनियल साइट्सवरील फसवणुकीचे वाढते प्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत. अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नये आणि कोणतीही वैयक्तिक माहिती देताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.