श्रावणाच्या पहिल्या सोमवारी सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषाने सोलापूर भक्तिमय

सोलापूरच्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच श्री सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविक मंदिरात दाखल होत होते. ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला. श्रावण महिन्यातील सोमवारला भगवान महादेवाच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने हजारो भाविकांनी मनोभावे श्री सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. मंदिर परिवारातील श्री सिद्धरामेश्वरांच्या योग समाधीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

सकाळी वैदिक मंत्रोच्चारात सामूहिक ‘ॐ नमः शिवाय’ जपाचे आयोजन करण्यात आले. या जपात हजारो भाविक सहभागी झाले होते. मंदिर परिसरात पूजेचे साहित्य आणि प्रसादाची दुकानेही थाटण्यात आली होती. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाकडून पिण्याचे पाणी, स्वयंसेवकांची व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, मंदिराच्या सभा मंडपात प्रदीप आर्ट अकॅडमीच्या कलाकारांनी भगवान शंकराची आकर्षक रांगोळी साकारली होती. ही रांगोळी पाहण्यासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली. श्री सिद्धेश्वर मंदिर हे सोलापूरकरांचे प्रमुख श्रद्धास्थान असून महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यानिमित्त भाविकांनी श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.