सोलापुरात गावठी पिस्तूलासह ५.५० लाखांची रोकड जप्त; एकाला अटक, साथीदार फरार

सोलापूर अक्कलकोट रस्ता एमआयडीसी भागातील नितीन नगर येथे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून ५ लाख ८७ हजार ५०० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल, ५ जिवंत काडतुसे आणि तब्बल ५ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. रोहित रघुनाथ अहिरे (वय २०, रा. सध्या सेंटलमेंट फ्री कॉलनी, सोलापूर. मूळ रा. पंढरपूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. नितीन नगर येथील कोंड्याल शाळेच्या पाठीमागे एक तरुण निळ्या रंगाच्या स्पोर्ट्स बॅगेत पिस्तूल घेऊन येणार असल्याची  माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून रोहितला ताब्यात घेतले.

चौकशीत ही रक्कम आणि पिस्तूल त्याचा मित्र प्रदीप हुसेनी गायकवाड (रा. सेंटलमेंट फ्री कॉलनी) याने ठेवण्यास दिल्याचे समोर आले. प्रदीपच्या वडिलांना कर्नाटक पोलिसांनी एका घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली असून, घरझडतीच्या भीतीने त्याने हा ऐवज रोहितकडे लपवला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपी प्रदीपचा शोध सुरू आहे.  रोहित हा नितीन नगर परिसरात पिस्तूल व रोकड घेऊन कशासाठी आला होता, तो ऐवज कोणाला देणार होता याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त प्रितम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमण,   पोलीस निरीक्षक बी.एस. बिराजदारसंगीता संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख अल्फाज शेख व पथकाने केली.

घरझडतीच्या भीतीने दिलेली  रोकड व पिस्तूल जप्त

कर्नाटक पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात हुसेनी गायकवाड यांना अटक केल्यानंतर त्यांच्या मुलगा प्रदीप याने घरझडतीच्या भीतीने पिस्तूल व  साडेपाच लाखांची रोकड त्याचा मित्र रोहित अहिरे याच्याकडे ठेवण्यासाठी दिली. परंतु तो ऐवज कर्नाटक पोलिसांच्या हाती लागण्याआधीच सोलापूर पोलिसांनी जप्त केला