१५ वर्षे लिव्ह-इन रिलेशन, नव्या प्रियकरामुळे वाद; वसंत सातपुतेची हत्या करून मृतदेह कसारा घाटात फेकला
नाशिकमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमधील वादातून धक्कादायक हत्या झाल्याचा
प्रकार समोर आला आहे. पाथर्डी फाटा परिसरात मागील १५ वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या
वसंत गोरखनाथ सातपुते आणि हसीना हबीब शेख यांच्या नात्यात हसीनाच्या आयुष्यात
नव्या व्यक्तीची एंट्री झाल्यानंतर संघर्ष निर्माण झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक
अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी वसंत घरात झोपले असताना
हसीनाचा कथित प्रियकर साहिल शहा त्याला भेटण्यासाठी आला. वसंतला साहिल दिसल्यानंतर
दोघांमध्ये वाद आणि झटापट झाली. या वादातून साहिलने वसंतचा गळा आवळून हत्या
केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हसीना आणि साहिल यांनी मिळून मृतदेहाची विल्हेवाट
लावण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आल्याचे वृत्त आहे.
दोघांनी वसंतचा मृतदेह कारमध्ये ठेवला आणि रात्री कसारा घाटात नेऊन
दरीत फेकल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना १६ ऑगस्ट रोजी ट्रक
चालकाच्या तक्रारीतून पोलिसांना या घटनेचा धागा मिळाला. या प्रकरणी नाशिकच्या
इंदिरानगर पोलिस ठाण्यात हसीना हबीब शेखविरुद्ध अपहरणासह खुनाचा गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर संशयितांची भूमिका आणि हत्येमागील नेमका
घटनाक्रम याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, मुंबई-नाशिक महामार्गावर जेवणासाठी थांबलेल्या ट्रेलर
चालकाची चाकूने भोसकून हत्या झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. पवनकुमार महतो
असे मृत चालकाचे नाव असून, पैसे देण्यास नकार दिल्याने
त्याच्यावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.