“होय, आम्ही झुरळ!” म्हणत युवा महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा

सोलापूर: देशातील युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा देत भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा काढण्यात आला. “होय, आम्ही झुरळ!” असे उपरोधिक जॅकेट परिधान करून आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत न्यायव्यवस्थेतील कथित वक्तव्याचा निषेध नोंदवला.

देशातील कोट्यवधी युवक शिक्षण, बेरोजगारी, महागाई, कंत्राटीकरण, पेपरफुटी, खासगीकरण आणि असुरक्षित भविष्य अशा विविध समस्यांशी झुंज देत असताना युवकांची तुलना “झुरळांशी” करणे अत्यंत संतापजनक असल्याची प्रतिक्रिया युवा महासंघाने व्यक्त केली. युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲड. अनिल वासम म्हणाले की, “हा केवळ शब्दांचा प्रश्न नसून देशातील तरुणांच्या स्वाभिमानावर घाव आहे. युवक हे देशाचे भविष्य असून त्यांच्याच श्रमावर देश उभा आहे.” राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनी सरकार आणि व्यवस्थेवर टीका करताना सांगितले की, युवक भीक मागत नाहीत तर आपल्या हक्काची मागणी करत आहेत. रोजगार, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने ठोस धोरण जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. मोर्चादरम्यान आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.

युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. निवेदनासोबत प्रतीकात्मक झुरळाची प्रतिमाही प्रशासनाला देण्यात आली. हे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान आणि भारताचे सरन्यायाधीश यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांनी प्रमुख मागण्यांमध्ये संबंधित न्यायाधीशांनी युवकांची जाहीर माफी मागावी, सर्वोच्च न्यायालयाने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, युवकांविषयी अपमानास्पद भाषेच्या घटनांवर स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी तसेच रोजगार आणि शिक्षणाच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय बैठक बोलावावी, अशा मागण्या केल्या.

या आंदोलनात दत्ता चव्हाण, ॲड. अनिल वासम, बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, अश्विनी मामाड्याल, नरेश गुल्लापल्ली, अभिजित निकंबे, दिनेश बडगु, चंटी बिटला, राधागोपाल बंडी आदी सहभागी झाले होते.