टाकळी हाजी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीसह कुटुंबीयांवर POCSO अंतर्गत गुन्हा

शिरूर : पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांसह एकूण आठ जणांविरोधात तसेच १० ते १५ अनोळखी व्यक्तींविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) अधिनियम, २०१२ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, जून २०२६ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत मुख्य आरोपीने अल्पवयीन मुलीच्या कमी वयाचा व अज्ञानाचा फायदा घेत तिच्यावर वारंवार इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच हा प्रकार कोणालाही सांगितल्यास तिच्याशी लग्न करणार नसल्याची धमकी देत तिला गप्प ठेवण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रार दाखल होऊ नये म्हणून आरोपी पक्षाकडून पीडित कुटुंबावर वारंवार दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यानंतर २ ऑगस्ट रोजी रात्री फिर्यादी यांच्या घरी दोन्ही पक्षांमध्ये तडजोडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीदरम्यान मुलीवरील कथित अत्याचाराबाबत जाब विचारल्यानंतर आरोपी पक्षातील व्यक्तींनी फिर्यादी कुटुंबाला शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत फिर्यादी यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस करत असून, संबंधित आरोपींविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.