सोलापुरात एअरगन दुकानासमोर गंधकाचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी, थरारक घटना CCTV मध्ये कैद
सोलापूर शहरातील जुनी मिल कंपाऊंड परिसरात सोमवारी दुपारी
भीषण स्फोटाची घटना घडली. ‘सहारा गन हाऊस’ या एअरगन दुकानासमोर गंधकाने भरलेला
बॉक्स ठेवताना अचानक स्फोट झाला. या घटनेत केदारनाथ सिद्धप्पा छत्रे (वय ५३) हे
गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे. मिळालेल्या
माहितीनुसार, सहारा गन हाऊससमोर उभ्या असलेल्या एका
चारचाकी वाहनात गंधकाने भरलेला बॉक्स ठेवत असताना तो हातातून खाली पडला आणि काही
क्षणातच जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की परिसर हादरला आणि मोठा आवाज
ऐकून नागरिक रस्त्यावर जमा झाले. घटनेनंतर नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती
दिली. पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. सामाजिक कार्यकर्ते
राज सलगर आणि स्थानिक नागरिकांनी जखमी केदारनाथ छत्रे यांना तातडीने शासकीय
रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी खासगी
रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या स्फोटामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण
झाले होते. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांकडून फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू
आहे. प्राथमिक माहितीनुसार, गंधकामुळे हा स्फोट झाल्याचा
संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून स्फोटाचे नेमके
कारण शोधण्याचे काम सुरू केले आहे.