हल्दिया रिफायनरीच्या नॅपथा पाइपलाइनला भीषण आग; १५ कर्मचारी होरपळले, रेल्वे सेवा ठप्प

पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया येथे मंगळवारी पहाटे रिफायनरीच्या नॅपथा सप्लाय पाइपलाइनमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर मोठी आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत १५ कर्मचारी होरपळल्याची माहिती समोर आली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅपथा पाइपलाइनमध्ये अचानक स्फोट झाला. त्यानंतर काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि हल्दिया नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १३ मधील चिरंजीबपूर परिसरापर्यंत तिचा फैलाव झाला.

स्थानिक नागरिकांनी मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकल्यानंतर घराबाहेर धाव घेतली. काही मिनिटांतच परिसरातील अनेक घरांनाही आगीची झळ बसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भीषण आगीमुळे परिसरातील रेल्वे सेवा तात्पुरती ठप्प करण्यात आली असून सुरक्षेच्या कारणास्तव काही मार्गांवरील वाहतूक रोखण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना दुर्घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.