जगातील 50 सर्वात उष्ण शहरांमध्ये भारतातील शहरांचा दबदबा; महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूरचा समावेश

देशभरात उष्णतेची तीव्र लाट सुरू असून अनेक शहरांमध्ये तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. शुक्रवारी संध्याकाळी 6:15 वाजेपर्यंतच्या AQI.in च्या आकडेवारीनुसार, जगातील सर्वाधिक उष्ण 50 शहरांमध्ये भारतातील शहरांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या यादीत उत्तर प्रदेशातील शहरांची संख्या सर्वाधिक आहे. मुरादाबाद, इटावा, प्रयागराज, आग्रा, वाराणसी, बरेली, मथुरा, गाझीपूर आणि अलीगड यांसारख्या शहरांमध्ये तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले गेले.

महाराष्ट्रातील नागपूर हे शहर 44 अंश सेल्सिअस तापमानासह जगातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी अव्वल स्थानावर राहिले. याशिवाय चंद्रपूरमध्येही 44 अंश तापमानाची नोंद झाली. छत्तीसगडमधील रायपूर आणि उत्तर भारतातील काही शहरांमध्येही उष्णतेची तीव्रता कायम असल्याचे दिसून आले. भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील काही भागांसाठी रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा असताना उष्णतेचा कहर नागरिकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.