सोलापूरच्या बाळीवेसमध्ये रावण वधाचा भव्य देखावा; अधर्मावर धर्माच्या विजयाचे दर्शन
सोलापूर : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध
नवरात्र मंडळांनी आकर्षक आणि सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले आहेत. यामध्ये
बाळीवेस येथील शक्तीपूजा समाजसेवा मंडळाने साकारलेला रावण वधाचा देखावा नागरिकांचे
विशेष लक्ष वेधून घेत आहे. अधर्मावर धर्माचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय
दर्शवणारा रावण वधाचा प्रसंग या देखाव्यातून जिवंतपणे साकारण्यात आला आहे. प्रभू
श्रीरामांनी रावणाचा वध करतानाचा थरारक प्रसंग आकर्षक विद्युत रोषणाई आणि
ध्वनी-प्रकाशाच्या माध्यमातून अधिक प्रभावी करण्यात आला आहे.
देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
हा देखावा पाहण्यासाठी सायंकाळपासूनच नागरिकांची गर्दी
होत आहे. देखाव्याची आकर्षक मांडणी आणि ध्वनी-प्रकाशाचा प्रभाव यामुळे परिसरात
उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी बाळीवेस शक्तीपूजा समाजसेवा मंडळाच्या
वतीने नवनवीन आणि कल्पक देखावे सादर केले जातात. यंदाही रावण वधाच्या देखाव्यातून
वाईटावर चांगल्याचा विजय होतो, हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला
आहे.
सोलापूरकरांना भेट देण्याचे आवाहन
शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने साकारलेला हा देखावा
पाहण्यासाठी जास्तीत जास्त सोलापूरकरांनी बाळीवेस येथे भेट द्यावी, असे आवाहन शक्तीपूजा समाजसेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.