जगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त सोलापुरात भव्य पालखी मिरवणूक उत्साहात
बाराव्या शतकातील क्रांतिकारी समाजसुधारक आणि वचनकार
जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी सोलापूर शहरात
भव्य सोहळा उत्साहात पार पडला. जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जन्मोत्सव
मध्यवर्ती मंडळाच्या वतीने भव्य पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती
शिवाजी महाराज पुतळा चौकातून महात्मा बसवेश्वर महाराजांची प्रतिमा पालखीत विराजमान
करून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. राज्यसभेच्या खासदार प्रा. ज्योती वाघमारे
तसेच शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी
महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पालखीत
असलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या मूर्तीची विधिवत पूजा करून मिरवणुकीस सुरुवात
झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात ही मिरवणूक बाळवेस, टिळक चौक, मधला मारुती मार्ग या प्रमुख मार्गांवरून
मार्गक्रमण करत कोणतम चौकातील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ
विसर्जित झाली. संपूर्ण मार्ग भक्तांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. या मिरवणुकीत
आमदार विजयकुमार देशमुख, मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त
अध्यक्ष प्रवीण दर्गोपाटील, उत्सव अध्यक्ष प्रसाद झुंजे
यांनी प्रमुख सहभाग नोंदवला. तसेच पालिकेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, चेतन नरोटे, नगरसेवक डॉ. किरण देशमुख, चंद्रकांत वानकर, सुधीर थोबडे, राजशेखर हिरेहब्बु, शिवानंद पाटील, नगरसेविका ऐश्वर्या गणेश साखरे, सिद्धेश थोबडे
यांच्यासह अनेक मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महात्मा बसवेश्वर महाराजांनी
दिलेल्या समता, बंधुता आणि “कायकवे कैलास” या तत्त्वांचा
वारसा जपत सोलापूरकरांनी या जयंती सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून
एकात्मतेचा संदेश दिला.