१४ कोटींची रोकड, मर्सिडीज आणि किलोभर सोनं जप्त; ढोंगी अशोक खरातला ईडीकडून अटक

लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून तसेच ब्लॅकमेलिंगद्वारे खंडणी उकळल्याप्रकरणी नाशिकच्या अशोक खरात याला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली आहे. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने आरोपी अशोक खरातला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. अशोक खरातवर महिलांचे लैंगिक शोषण, बलात्कार, अघोरी प्रथा आणि व्यापाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळल्याचे गंभीर आरोप आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने मोठी कारवाई करत त्याच्या मालमत्तांवर छापे टाकले.

ईडीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरात हा स्वतःला “भगवान शिवाचा अवतार” असल्याचे सांगत असे. अलौकिक शक्ती आणि दिव्य ज्ञान असल्याचा दावा करून तो भाविकांना जाळ्यात ओढत होता. अघोरी विधी, काळी जादू आणि मृत्यूची भीती दाखवून लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप आहे. एका तक्रारदाराकडून तब्बल ५.६२ कोटी रुपये उकळल्याचे तपासात उघड झाले आहे. या पैशांतून त्याने मर्सिडीज कार खरेदी केली, परदेश दौरे केले, अमेरिकेत उपचार घेतले तसेच फार्महाऊस उभारल्याची माहिती ईडीने दिली. १३ एप्रिल ते १८ मे दरम्यान ईडीने अशोक खरात आणि त्याच्या साथीदारांच्या घरांवर, कार्यालयांवर आणि बँक लॉकरवर छापेमारी केली. या कारवाईत १३.९२ कोटी रुपयांची रोकड, ,५०० अमेरिकन डॉलर्स, १.१२ कोटींचे सोने-चांदीचे दागिने, २.२५ कोटींच्या ठेवी, महागडी मर्सिडीज कार, डिजिटल उपकरणे आणि बेनामी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली.

तपासात असेही समोर आले की, काळा पैसा पांढरा करण्यासाठी खरातने विविध बँका आणि पतसंस्थांमध्ये बनावट खाती उघडली होती. संबंधित व्यक्तींना त्याची माहितीही नव्हती. या खात्यांमधून मोठ्या प्रमाणात रोकड व्यवहार केल्याचा आरोप आहे. या हायप्रोफाईल प्रकरणात ईडीने यापूर्वी काही राजकीय आणि आर्थिक संबंधित व्यक्तींचीही चौकशी केली असून, खरातच्या मालमत्तांच्या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास सुरू आहे.