देगाव गॅस दाहिनी अखेर कार्यान्वित; नगरसेवक गणेश वानकर यांच्या प्रयत्नांना यश

सोलापूर : सोलापूर शहरातील देगाव येथील गॅस दाहिनी स्मशानभूमी अखेर कार्यान्वित झाली असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे. प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य Ganesh Wankar यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले आहे.

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुमारे २२ कोटी रुपये खर्च करून शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये गॅस दाहिनी बसवण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या साडेतीन ते चार वर्षांपासून प्रशासकीय कारणांमुळे आणि अंतर्गत समन्वयाच्या अभावामुळे देगाव गॅस दाहिनी सुरू होऊ शकली नव्हती. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत गणेश वानकर यांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. सभागृहात प्रश्नांची सरबत्ती करताच प्रशासन खडबडून जागे झाले आणि तात्काळ गॅस दाहिनी सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. आज सकाळी गणेश वानकर यांनी देगाव येथील नागरिकांसमवेत गॅस दाहिनीची पाहणी केली. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अंतिमसंस्काराची प्रक्रिया सविस्तरपणे समजावून सांगितली.

या गॅस दाहिनीमुळे:

  • अंतिमसंस्काराचा खर्च कमी होणार
  • पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार
  • आधुनिक व सुलभ सुविधा उपलब्ध होणार

दरम्यान, दाहिनी परिसरातील काही कामे अद्याप अपूर्ण असून ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना वानकर यांनी प्रशासनाला दिल्या. या पाहणीवेळी स्थानिक नागरिकांसह महापालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.