“बाटली फेकून मारणं योग्य नाही”; महिला मोर्चा प्रकरणावर गिरीष महाजन यांची प्रतिक्रिया

मुंबई : भाजपच्या महिला आरक्षण दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान गोंधळाची घटना घडली. या मोर्चामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाल्याने एका महिलेने संताप व्यक्त करत त्वरित ट्रॅफिक क्लिअर करण्याची मागणी केली. यावेळी तिने मंत्री गिरीष महाजन यांच्यावरही तीव्र शब्दांत टीका केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गिरीष महाजन म्हणाले की, “आमचा मोर्चा महिलांसाठीच आयोजित करण्यात आला होता. तो महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर होता. त्या महिलेचा राग अनावर झाला होता, त्यामुळे त्यांनी ती प्रतिक्रिया दिली. मात्र यापुढे आम्ही नक्कीच अधिक काळजी घेऊ.”

महाजन पुढे म्हणाले की, मोर्चे किंवा आंदोलने असताना अशा घटना घडत असतात. “आम्ही पोलिसांची आवश्यक परवानगी घेतली होती. मात्र संबंधित महिलेची भाषा संसदीय नव्हती. त्यांना आपला राग योग्य पद्धतीने मांडता आला असता किंवा त्यांनी पोलिसांकडे तक्रारही करू शकली असती,” असे त्यांनी नमूद केले. मोर्चाच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित झाल्यावर त्यांनी सांगितले की, “काही प्रमाणात नागरिकांना त्रास झाला हे आम्ही मान्य करतो. मात्र प्रत्येक मोर्चात असे काही प्रमाणात होत असते. आमचा मोर्चा नियोजित मार्गाने आणि परवानगी घेऊनच काढण्यात आला होता. त्यामुळे नियोजनात मोठी चूक झाली असे म्हणता येणार नाही.” या घटनेमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, मोर्चांदरम्यान नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.