आहेरवाडी येथे तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; अनैतिक संबंधातून हत्येचा संशय
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथे शेतातील
वस्तीत झोपलेल्या २४ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात
आल्याची घटना घडली. सचिन अभिमन्यू सासवे (वय २४, रा. आहेरवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वळसंग पोलिसांनी
गावातील संशयित आरोपी पिता-पुत्राला अटक केली असून, अनैतिक संबंधाच्या कारणातून हा खून
झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शेतात झोपलेल्या तरुणावर हल्ला
सचिन सासवे हा शनिवारी रात्री आहेरवाडी येथील स्वतःच्या
शेतात झोपला होता. रविवारी पहाटेच्या सुमारास संशयित आरोपीने त्याच्यावर
कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने सपासप वार केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात
सचिन गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तो घटनास्थळीच पडून
होता. सकाळी ही घटना लक्षात आल्यानंतर वळसंग पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा
घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलिसांचे अधिकारी व कर्मचारी
तातडीने आहेरवाडी येथे दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह
शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पोलिसांनी संशयित आरोपी धोंडिबा क्षेत्री (वय ४०) आणि त्यांचा
मुलगा आयुष क्षेत्री (वय २०, दोघे रा. आहेरवाडी) यांना अटक केली आहे.
अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय
या प्रकरणी वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
असून, अनैतिक संबंधाच्या कारणातून सचिन सासवे यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण
घटनाक्रम तपासातून स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे
आहेरवाडी परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास
सुरू आहे.