तृतीयपंथीयाची स्मशानभूमीत गळफास घेऊन आत्महत्या; प्रेमप्रकरणातून पाऊल उचलल्याचा आरोप
सोलापूर : हॉटगी रोडवरील साखर कारखान्याजवळील स्मशानभूमीत एका २२
वर्षीय तृतीयपंथीयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अभिजित
उर्फ कोमल हरीबा नागटिक्क (वय २२, रा. साईनाथ नगर, साखर
कारखान्याजवळ, हॉटगी रोड) असे
मृताचे नाव आहे. या घटनेनंतर तृतीयपंथीय समाजातील व्यक्तींनी आरोपीला अटक करण्याची
मागणी करत शासकीय रुग्णालयात गर्दी केली.
स्मशानभूमीत आढळला बेशुद्ध अवस्थेत
अभिजित उर्फ कोमल याने स्मशानभूमीत गळफास घेतल्याची
माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याला खाली उतरवले. त्यावेळी तो
बेशुद्ध अवस्थेत होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने त्याला उपचारासाठी
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच
त्याला मृत घोषित केले.
प्रेमसंबंधाच्या पार्श्वभूमीवर आरोप
मृत कोमलचे शुभम जाधव नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध
असल्याचे सांगण्यात येत आहे. शुभम हा कोमलला मानसिक व शारीरिक त्रास देत होता, तसेच त्याच्याकडून वारंवार मारहाण केली जात असल्याचा आरोप कोमलची गुरु
रोहिणी मोरे आणि इतर तृतीयपंथीयांनी केला आहे. मृत्यूपूर्वी कोमलने शुभमशी व्हिडिओ
कॉलद्वारे संपर्क साधला होता, तसेच दोघांमधील चॅटिंगचे
पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही तृतीयपंथीय समाजातील व्यक्तींनी केला आहे.
आरोपीला अटक करण्याची मागणी
या प्रकरणात संबंधित आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर
कारवाई करावी, तसेच मृत कोमलला न्याय मिळावा, अशी मागणी तृतीयपंथीय समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची पोलीस चौकशी करत असून, आत्महत्येमागील
नेमके कारण आणि संबंधित व्यक्तीची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.