नंदी साखर कारखान्यातील रु 12.33 कोटी रुपयांचा ऊस वजन घोटाळा उघड; बबलेश्वर पोलिसांच्या कारवाईत आठ आरोपी अटक, ₹11.32 कोटी जप्त
विजयपूर:- नंदी साखर कारखान्यात ऊस वजनात बनावट नोंदी करून
कोट्यवधी रुपयांचा अपहार करणाऱ्या बहुकोटी घोटाळ्याचा बबलेश्वर पोलिसांनी पर्दाफाश
केला असून, या प्रकरणात आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तसेच ₹ 11.32 कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आली
असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली
12 जून 2026 रोजी बबलेश्वर
पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 29/2026
अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंदी साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक अशोक
संगप्पा टिप्पारेड्डी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, कारखान्याच्या ऊस वजन विभागात कार्यरत धरेप्पा
दुंडप्पा नावी व इतरांनी संगनमत करून 2020-21 ते 2025-26 या सहा गाळप
हंगामांदरम्यान बनावट टोकन व बोगस बिले तयार करून शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधी
रुपयांचा अपहार केल्याचा आरोप होता.
सखोल तपासात कटाचा पर्दाफाश
अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामनगौडा हत्ती आणि ग्रामीण उपविभागीय पोलीस
अधिकारी टी. एस. सुल्फी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रमेश अवजी यांच्या नेतृत्वाखालील
विशेष तपास पथकाने कारखान्यातील ऊस वजन केंद्राच्या नोंदींची तपासणी केली.
तपासात आरोपींनी वजन मापन
यंत्रणेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मदतीने बनावट टोकन तयार करून ऊस वाहतूक करणाऱ्या
वाहनांच्या वजनाशी त्यांची सांगड घालून बोगस बिले तयार केल्याचे उघड झाले.
याच पद्धतीने यापूर्वी बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातील विविध साखर
कारखान्यांमध्येही अशाच प्रकारची फसवणूक केल्याचा संशय असून, विजयपूर
जिल्ह्यातील नंदी साखर कारखान्यातही त्याच पद्धतीचा वापर करण्यात आल्याचे तपासात
निष्पन्न झाले.
₹12.33 कोटींचा अपहार
2020-21 ते 2025-26 या कालावधीत आरोपींनी सुमारे 34,490.699 मेट्रिक
टन ऊसाचे वजन कृत्रिमरीत्या नोंदवून 91 विविध बँक खात्यांमध्ये एकूण ₹12,33,22,793
इतकी रक्कम वर्ग करून अपहार केल्याचे** तपासात स्पष्ट झाले.
₹11.32 कोटींची रक्कम जप्त
मुख्य आरोपी धरेप्पा दुंडप्पा नावी याच्याकडून:
* ₹21 लाख रोख,
* बँक खात्यातील ₹4,80,47,981,
* इतर बँक खात्यांमध्ये वर्ग झालेली ₹5,48,52,102,
अशी एकूण *₹10,50,00,083* रक्कम जप्त करण्यात आली.
याशिवाय विविध बँक खात्यांतील *रु 82,07,569 रक्कम गोठविण्यात (फ्रीज)
आली असून, एकूण
*₹11,32,07,569 इतकी रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
8 आरोपी अटकेत
मुख्य आरोपी धरेप्पा दुंडप्पा नावी याच्यासह भीरप्पा गाडदार, यल्लप्पा
गाडदार, प्रकाश गड्डी, परमानंद गड्डी,
महादेव कांबळे (सिंगे), बाळप्पा चोपडे आणि
प्रभाकर सिंगे अशा एकूण आठ आरोपींना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात
आली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून तपास पुढे सुरू आहे.
तपास पथकाचे कौतुक
अल्पावधीत कोट्यवधी रुपयांच्या या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश करून
आरोपींना अटक करणाऱ्या विशेष तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे
जिल्हा पोलीस विभागाने कौतुक केले असून, त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.