झेडपी अनुकंपा भरती २८ उमेदवार अपात्र; २४६ जणांची यादी प्रसिद्ध

सोलापूर, दि. २४ - सोलापूर जिल्हा परिषद अनुकंपा भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रक्रियेत २७४ उमेदवारांपैकी विविध कारणांमुळे २८ उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. दरम्यान, पात्र असलेल्या २४६ उमेदवारांची अंतिम यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनुकंपा भरतीसाठीच्या यादीत २७४ उमेदवारांचा समावेश होता. परंतु दोनपेक्षा अधिक अपत्य असणे, अनुकंपाधारक कुटुंबातील इतर व्यक्ती शासकीय सेवेत असणे, पुनर्विवाह करणे, वयोमर्यादा ४५ वर्षांपेक्षा अधिक असणे आदी विविध कारणांमुळे २८ उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. अनुकंपा भरती प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता असून उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी आधीच पूर्ण झाली आहे. एकूण रिक्त पदांपैकी २०% जागा अनुकंपाधारकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने इतर विभागांतील पात्र उमेदवारांना पदोन्नती देऊन अनुकंपाधारकांच्या भरतीचा मार्ग मोकळा केला आहे. अपात्र ठरलेल्या २८ उमेदवारांमध्ये दोनपेक्षा अधिक अपत्य असणारे १४, पुनर्विवाह केलेला १, कुटुंबातील इतर व्यक्ती शासकीय सेवेत असलेले ८, मुदतीत अर्ज सादर न केलेले ४, आणि ४५ वर्षांहून अधिक वयोमर्यादा असणारा १ उमेदवाराचा समावेश आहे.