सोलापूरमध्ये तरुणाची आत्महत्या, दोन जणांवर गुन्हा दाखल.

सोलापूर :
माझी इच्छा नव्हती, पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं...अशी वेदनादायक चिठ्ठी लिहून आनंद शिंदे (वय ३६) या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी सोलापुरातील सलगरवस्ती परिसरात उघडकीस आली. माहितीनुसार, आनंद शिंदे हा दमाणी नगर येथे राहत होता. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास तो मावशी शहाबाई जगताप यांच्या घरी आला. घरात कुणी नसल्याची संधी साधून त्याने छताच्या वाशाला दोरीने गळफास घेतला. काही वेळानंतर मावशी घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

तीन चिठ्ठ्या सापडल्या
आनंदने आत्महत्येपूर्वी लहान डायरीच्या पानांवर तीन चिठ्ठ्या लिहिल्या. पहिल्या चिठ्ठीत त्याने आई-वडील व कुटुंबीयांची माफी मागत लिहिले – मी चुकलो, हरलो... ना मी तुमचा झालो ना तुम्ही माझे.” दुसऱ्या चिठ्ठीत त्याने आरोप केला की, माझी इच्छा नव्हती फाशी घ्यायची, पण मला घ्यायला भाग पाडलं. माझा मोबाईल हॅक करून मला खूप निराश केलं.” त्यात त्याने अरुण रोडगे याचे नाव स्पष्टपणे लिहिले. तिसऱ्या चिठ्ठीत शकलेश जाधव यांचे नाव नमूद करून सही केली.

कुटुंबीयांचा आक्रोश
आनंदचे नातेवाईक घटनास्थळी धावत आले. त्याच्या आई अंजना शिंदे यांनी रडताना सांगितले, चार वर्षांपूर्वी एक मुलगा गेला, आता दुसरा मुलगाही गेला...!” त्यांनी सांगितले की, सहा महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणात आनंदला जबर मारहाण करण्यात आली होती.

पोलीस कारवाई
सलगरवस्ती पोलिस ठाण्याचे निरीक्षक उमाकांत शिंदे यांनी सांगितले की, आनंदच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अरुण रोडगे व शकलेश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.