WPL 2026 मध्ये RCB चा गुजरात जायंट्सवर दमदार विजय; गुणतालिकेत अव्वल स्थान

महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आपला विजयी रथ सुरूच ठेवत गुजरात जायंट्सचा ३२ धावांनी पराभव केला. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात आरसीबीने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात दमदार कामगिरी केली. या विजयासह आरसीबीने तीन विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थान (क्रमांक १) पटकावले आहे.

RCB ची आक्रमक फलंदाजी

गुजरात जायंट्सची कर्णधार अॅश्ले गार्डनरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र आरसीबीच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेत २० षटकांत ७ बाद १८७ धावा केल्या. आरसीबीकडून राधा यादव हिने अफलातून खेळी करत ४७ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या. तिच्या या खेळीने संघाला भक्कम धावसंख्या उभारून दिली. तसेच रिचा घोष हिने २८ चेंडूत ४४ धावांची झुंजार खेळी केली. गुजरातकडून सोफी डिव्हाइन हिने ३, तर काश्वी गौतम हिने २ विकेट्स घेतल्या.

श्रेयंका पाटीलचा भेदक मारा

१८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात जायंट्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. एकामागून एक विकेट्स पडत गेल्याने गुजरातचा डाव सावरलाच नाही.
भारती फुलमाली हिने सर्वाधिक ३९ धावा केल्या; मात्र इतर फलंदाज अपयशी ठरले.

विशेष म्हणजे, गुजरातच्या निम्म्याहून अधिक फलंदाजांना एकट्या श्रेयंका पाटील हिने गुडघे टेकायला लावले. तिच्या अचूक आणि टिच्चून गोलंदाजीमुळे गुजरात जायंट्सचा संपूर्ण संघ १८.५ षटकांत १५० धावांवर गारद झाला.

RCB चे वर्चस्व कायम

या विजयामुळे आरसीबीने WPL 2026 मध्ये आपले वर्चस्व अधिक ठळक केले असून, स्पर्धेतील सर्वात मजबूत संघ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. राधा यादव, श्रेयंका पाटील आणि रिचा घोष यांच्या कामगिरीमुळे RCB चा आत्मविश्वास शिखरावर आहे