अक्कलकोट येथे जागतिक अग्निहोत्र दिनानिमित्त आधुनिक जगातील सर्वात मोठ्या अग्निमंदिराची स्थापना

अक्कलकोट :  जागतिक अग्निहोत्र दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र शिवपुरीच्या पवित्र भूमीत आधुनिक जगातील सर्वांत मोठ्या अग्निमंदिराची स्थापना करण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण आध्यात्मिक उपक्रमाची घोषणा शिवपुरी विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांनी केली. या मंदिराची स्थापना विशेष पद्धतीने करण्यात येणार आहे. जगभरातील 60 हून अधिक देशांमध्ये रोज अग्निहोत्र करणाऱ्या घरांमधून आणलेले अग्निहोत्र भस्म या मंदिराच्या पायाभरणीसाठी वापरण्यात येणार आहे. हे मंदिर ज्ञान, प्रकाश आणि मोक्ष प्राप्तीचे प्रतीक म्हणून सहस्रदल कमळाच्या आकारात उभारण्यात येणार आहे. डॉ. राजीमवाले यांनी स्पष्ट केले की, या मंदिरातील पंच अग्नींची ज्वाला प्रगती आणि आध्यात्मिक उन्नती दर्शवते. मंदिराच्या शिखराचे सात टप्पे सप्तस्वर्गाचा मार्ग दर्शवतात. तसेच, सप्त सागर, सप्त सिंधू म्हणजेच जगभरातील नद्यांचे पाणी आणून त्याचे अभिषेक आणि प्रोक्षण करण्यात येणार आहे. मंदिर परिसरात तीर्थकुंडाची स्थापना, तसेच सप्त मंदिरांची परिक्रमा हा एक अध्यात्मिक प्रवास ठरणार आहे. शिवपुरीतील पवित्र वटवृक्षाच्या सान्निध्यात तर्पण केल्याने पूर्वजांचे दोष दूर होतात, असे सांगण्यात आले. हा ऐतिहासिक सोहळा उद्या, १२ मार्च रोजी डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले व डॉ. गिरीजा राजीमवाले यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, अशी माहिती नाना गायकवाड यांनी दिली. यावेळी अण्णा वाले, मोहन डांगरे, वक्रतुंड औरंगाबादकर, पवन कुलकर्णी, डॉ. गणेश थिटे, धनंजय वाळुंजकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.