आमदार निवासातील कार्यकर्त्याचा मृत्यू; रुग्णवाहिका वेळेवर न आल्याचा नातेवाईकांचा आरोप

मुंबई :- भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आकाशवाणी आमदार निवासातील रूम नंबर 408 मध्ये मुक्कामास असलेले त्यांचे कार्यकर्ते चंद्रकांत धोत्रे यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मात्र, या मृत्यूनंतर रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने आणि उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला, असा गंभीर आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. चंद्रकांत धोत्रे हे एका बैठकीसाठी मुंबईत आले होते आणि आमदार देशमुख यांच्या रूममध्ये मुक्कामाला होते. रात्री अचानक त्यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णवाहिकेला कॉल करण्यात आला. पण ती वेळेवर पोहोचली नाही, त्यामुळे उपस्थितांनी पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधला. अखेर पोलिसांच्या व्हॅनमधून धोत्रे यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर मृतकाच्या नातेवाइकांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली असून, "वेळेवर रुग्णवाहिका मिळाली असती तर चंद्रकांत धोत्रे यांचा जीव वाचू शकला असता," असे मत व्यक्त केले आहे. या घटनेने आमदार निवासातील आपत्कालीन सेवा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.