मैंदर्गीत विवाहितेची मुलासह विहिरीत उडी; सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे कौटुंबिक छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.

मृत महिलेचे नाव भाग्यश्री सिद्धप्पा कट्टीमनी (वय ३०, रा. मैंदर्गी) असे असून तिच्या दोन वर्षीय मुलाचे नाव शिवराज सिद्धप्पा कट्टीमनी असे आहे. भाग्यश्री यांनी तोरणी रोडलगत असलेल्या विहिरीत मुलासह उडी घेत आयुष्य संपवले. घटनेची माहिती मिळताच भाग्यश्री यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकरी आणि पोलिसांच्या मदतीने विहिरीतून प्रथम दोन वर्षीय शिवराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याला तातडीने अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर भाग्यश्री यांचा मृतदेहही विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी मृत महिलेच्या आई कलव्वा बसप्पा पुजारी (रा. भोसगा पुजारी, ता. अफजलपूर, जि. कलबुर्गी, कर्नाटक) यांनी सासरच्या मंडळींकडून वारंवार छळ होत असल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दाखल फिर्यादीनुसार तिपव्वा कट्टीमणी, शरणप्पा कट्टीमणी, सिद्धप्पा कट्टीमणी, समर्थ कट्टीमणी, नागनाथ कट्टीमणी, गगव्वा पुजारी आणि यालप्पा कट्टीमणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सासू, सासरे, पती, दीर, नणंद आणि अन्य नातेवाईकांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार अमोल माने करत आहेत.