सोलापुरातील धक्कादायक घटना; दुषित पाणी पिल्याने दोन शाळकरी मुलींचा मृत्यु

सोलापूर: शहरातील जगजीवन राम नगर मोदी परिसर येथे राहणाऱ्या दोन
शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुलींच्या मृत्यूनंतर
सर्वत्र शोककळा पसरलेली आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे दोन चिमुकलींचा जीव गेल्याची
माहिती समोर येत आहे. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पिवळसर रंगाचे दूषित
पाणी पुरवठा केला जात आहे. या वस्तीमध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांचे जीव यामुळे
धोक्यात आलेले आहेत. यापूर्वी देखील अनेक नागरिकांना जुलाब आणि उलटी याचा त्रास
सुरू झालेला आहे.दरम्यान या भागाला जोडणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये
दूषित पाणी मिसळत असल्याचे समोर आले आहे. ड्रेनेजचेंबर मधून पिण्याची पाईपलाईन
गेल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाणी प्यायल्याने येथे
राहणाऱ्या नागरिकांना उलटी आणि जुलाबचा वारंवार त्रास होत आहे. या दुःखद घटनेची
माहिती मिळताच शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार माजी नगरसेवक किसन जाधव यांनी
तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना
यासंबंधी चौकशीचे आदेश दिले. त्याचप्रमाणे दुःखी कुटुंबांचे स्वांतन करत आर्थिक
सहाय्य उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे या भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांची आरोग्य
तपासणी करण्याचे आदेश देखील रवी पवार यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले
आहेत. मोदी परिसरास पाणीपुरवठा करणारी पिण्याची पाईपलाईन ड्रेनेज चेंबर मधून घातली
असल्याचे बाब समोर आले आहेत. येथील नागरिकांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,
ज्या दिवशी ड्रेनेज चेंबर स्वच्छ केले जाते, त्या
दिवशी चांगले पाणी येते. परंतु जोपर्यंत ड्रेनेज चेंबर स्वच्छ केले जात नाही
तोपर्यंत पिवळसर अस्वच्छ दूषित पाणी येते. अशा घटना वारंवार घडतात. महापालिकेचे
संबंधित अधिकारी कर्मचारी याकडे डोळे झाक करतात. यापूर्वी देखील अशा दुःखद घटना
घडलेल्या आहेत. असा आरोप देखील त्यांनी यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार आणि आमदार
देवेंद्र कोठे यांच्या समोर केला. खासदार प्रणिती शिंदे यांनीही तातडीने घटनास्थळी
भेट देऊन पाहणी केली. महापालिकेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला.