दिल्ली भाजप सत्तेचा वनवास संपणार का?
.jpeg)
दिल्ली विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी तयारी सुरू
केली आहे. २०१३ पासून दिल्लीत सत्तेत असलेल्या 'आप' आणि त्याआधी
जवळ- जवळ १५ वर्षे सत्तेत असणारी काँग्रेस. त्यामुळे हा २६ वर्षांचा 'वनवास' संपवण्यासाठी भाजपने आता दिल्ली विधानसभेची
तयारी सुरू केली आहे. मात्र, २०२५ ची निवडणूक सर्वच
पक्षांसाठी अनेक अर्थानी महत्त्वाची आहे. आता सत्तेच्या हॅट्ट्रिकच्या तयारीत
असणारे अरविंद केजरीवाल विविध योजनांचा भडिमार दिल्लीच्या जनतेवर करत आहेत.
त्यामुळेच त्यांनी गेल्या काही दिवसांत पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र,
अजून भाजपकडून कोणत्याही प्रकारची घोषणा झाली नाही. निवडणुकीपूर्वी
केजरीवालांच्या घोषणांवर घोषणा चालू आहेत. त्यामुळे भाजप 'आप'च्या पंचसूत्रीचा मुकाबला कसा करणार हे बघणे महत्त्वाचे आहे.
अरविंद केजरीवाल यांनी महिलांसाठी दरमहा २१०० रुपये, संजीवनी योजनेंतर्गत ६० वर्षांवरील व्यक्तींसाठी मोफत उपचार, वृध्दांसाठी पेन्शन योजना, दिल्लीकरांसाठी २४ तास शुध्द पाणी, मंदिरांचे पुजारी आणि गुरुद्वारांच्या पुजाऱ्यांना मानधन देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीची लढाई केजरीवाल आणि 'आप' दोघांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाची आहे. केजरीवाल यांच्यासह पक्षाचे अनेक नेते 'आप'च्या या आश्वासनांना मास्टरस्ट्रोक म्हणत आहेत. पण 'आप'ने जाहीर केलेल्या घोषणांवरून भाजप हल्लाबोल करत आहे. भाजप या आश्वासनांवर बोलताना, केजरीवाल जनतेला फक्त खोटी आश्वासने देत आहेत, त्यांनी नेहमीच जनतेची फसवणूक केली आहे, असे आरोप करत आहे. 'आप'ने आतापर्यंत महिला सन्मान आणि संजीवनी योजना जाहीर केल्यावर भाजपने ही मोठी फसवणूक असल्याचे म्हटले आणि 'आप' गेली १० वर्षे सत्तेत आहे. पण त्यांनी एकाही महिलेला १० रुपयांची मदत दिली नाही. त्यांनी ही योजना यापूर्वीच राबवायला हवी होती. पण आता निवडणुकीपूर्वी ते वृध्द आणि महिलांना खोटी आश्वासने देत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून अद्याप कोणताही जाहीरनामा जाहीर करण्यात आलेला नाही. तसेच कोणतेही मोठे आश्वासन दिलेले नाही. मात्र भाजप महिला, वृध्द आणि तरुणांसाठी काही मोठ्या घोषणाही करू शकते, असे मानले जात आहे. नुकतेच भाजपचे खासदार मनोज तिवारी म्हणाले होते की, ते दिल्लीतील जनतेला 'आप'च्या आश्वासनापेक्षा पाचपट अधिक देण्यास तयार आहेत.