‘लाडकी बहीण’साठी इतर योजना थांबवणार का? निधीवाटपावरून वाद

मुंबई : राज्यातील महिलांसाठी सुरु असलेली 'लाडकी बहीण योजना' सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता वेळेवर न आल्याने काही नाराजी व्यक्त होत असतानाच, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी आरोप केला की, या योजनेसाठी खात्याचा निधी वळवण्यात आला आहे. या आरोपांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की, "कोणत्याही खात्याचा निधी वळवण्यात आलेला नाही. योजना बंद होणार नाही, खऱ्या लाभार्थ्यांना नियमितपणे हप्ता मिळत राहील", असे सांगितले. अजित पवार पुढे म्हणाले की, "लाडकी बहीण योजनेतून दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. यासाठी ४५ हजार कोटी रुपये खर्च होतो. एखाद्या महिन्यात विलंब झाला तरी अफवा पसरवल्या जातात. त्यावर विश्वास ठेवू नये." महिला उद्योजिकांना कर्जाची संधी
उपमुख्यमंत्र्यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा करत सांगितले की, "ज्या बहिणींना उद्योग सुरू करायचा आहे पण भांडवल नाही, अशा महिलांना योजनेतील रकमेच्या हमीवर ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे. बँकांशी समन्वय साधून शासन यावर काम करत आहे." निधी वळवण्याचा मुद्दा – प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
या वादावर स्पष्टीकरण देताना, लाडकी बहीण योजनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "सामाजिक न्याय व आदिवासी विकास खात्याचा निधी वळवलेला नाही. योजनांच्या वाटपात खातेवार तांत्रिक विभागणी होते. अनुसूचित जाती-जमातींसाठी स्वतंत्र बजेट राखीव असते."