उपांत्य फेरीत भारतासमोर कोण? क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफीत ऑस्‍ट्रेलिया हा उपांत्य फेरीत धडक मारणारा तिसरा संघ ठरला आहे. लाहोरमध्ये शुक्रवारी  ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेलेला सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. सामनाच रद्द करण्यात आल्‍याने दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आले. यामुळे भारत आणि न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलियाने ४ गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. चौथ्या संघाचा निर्णय द. आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील आज  शनिवारी  होणाऱ्या सामन्याच्या निकालावरून ठरेल. मात्र रविवारी भारत आणि न्‍यूझीलंड यांच्‍यातील सामन्‍यानंतरच उपांत्‍य फेरीत भारताचा कोणाशी मुकाबला होणार हे स्‍पष्‍ट होणार आहे. अफगाणिस्तानचे लक्ष आज  दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यावर असेल. दक्षिण आफ्रिकेच्‍या संघाचा आज मोठा पराभव झाला तर अफगाणिस्तानच्‍या अशा जिवंत राहतील. मात्र हे आव्‍हान खडतर आहे. इंग्लंड संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी केल तर दक्षिण आफ्रिकेला किमान २०७ धावांनी पराभूत करावे लागेल. तसेच दुसऱ्या डावात फलंदाजीला आला तर दक्षिण आफ्रिकेने दिलेले लक्ष्‍य ११.१ षटकांत पूर्ण करावे लागले. त्‍यामुळे आता इंग्‍लंडच्‍या संघाने चमत्‍कार केला तरच अफगाणिस्‍तानच्‍या आशा जिवंत राहणार आहेत. क्रिकेटमध्‍ये अशक्‍य असे काहीच नसते. तरीही यास्‍पर्धेत बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघ एवढ्या मोठ्या फरकाने पराभूत होण्‍याची शक्‍यता कमी आहे. भारत दुबईमध्ये पहिला उपांत्य सामना खेळणार आहे. गट अ मधून भारत आणि न्यूझीलंड दोघेही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. दोन्ही संघ रविवारी होणाऱ्या शेवटच्या साखळी सामन्यात आमने-सामने असतील. हा सामना जिंकणारा संघ अ गटात अव्वल स्थानावर राहील. हा संघ उपांत्य फेरीत गट ब मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी सामना करेल, तर गट अ मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाचा सामना ब गटातील अव्‍वल असणार्‍या संघाशी होईल. सध्या तरी न्यूझीलंड भारतापेक्षा चांगल्या नेट रन रेटसह गट अ मध्ये अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघाने रविवारी होणारा न्यूझीलंडविरुद्धचा सामना हरला तर दुबईतील उपांत्य फेरी भारताला ऑस्ट्रेलियाचा मुकाबला करावा लागले. जर दक्षिण आफ्रिका संघाने इंग्लंडचा पराभव करुन '' गटात अव्वल स्थान मिळवले तसेच रविवारी २ मार्च रोजी होणार्‍या सामन्‍यात न्‍यूझीलंडने भारताचा पराभव केला तर दुबईमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात उपांत्य सामना होईल. आज दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील सामन्‍यात दक्षिण आफ्रिका संघाचा मोठा पराभव झाल्‍यास अफगाणिस्तानच्‍या अशा जिवंत राहतील.