हद्द निश्चिती पण अतिक्रमण हटविणार कधी ? विजापूर रस्त्यावर नागरिकांनी बळकाविला सर्व्हिस रोड

सोलापूर, दि. ६-

विजापूर रस्त्यावरील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेच्या विशेष पथकाने हद्दनिश्चती केली. पण अतिक्रमण हटविणार कधी, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. व्यावसायिक आणि नागरिकांनी सर्व्हिस रोड बळकाविल्यामुळे अतिक्रमण हटविताना महापालिकेच्या पथकाला विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उपअभियंता कमलाकर कटकधोंड यांनी शहरातील राष्ट्रीय महामार्ग अतिक्रमणमुक्त केले होते. आज त्यांच्यामुळेच महामार्ग रूंद दिसत असला तरी सव्र्व्हिस रोडवर नागरिकांनी केलेल्या अतिक्रमणाकडे 

महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. जुना विजापूर नाक्यापासून सोरेगावपर्यंतच्या सव्र्व्हिस रोडवर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण फोफावले आहे. भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे. बांधकामासाठी वाळू, विटा, क्रश विकणाऱ्यांनी सव्र्हिस रोडवर बाजार मांडला आहे. अतिक्रमणामुळे विजापूर रस्त्यावर अपघाताचा धोकाही वाढला आहे. 

मासे आणि मटण विक्रीसाठी महापालिकेने मंगळवार बाजारात अद्ययावत सोय करून दिली असतानाही विजापूर रस्त्यावर ठिकठिकाणी मटण विक्रीची दुकाने थाटली आहेत. इंचगेरी मठाच्या समोरच मासे विकली जातात. त्यामुळे येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या भावनांना 

ठेच पोहोचत आहे. सैफूल ते एसआरपी कॅम्प यादरम्यानच्या दोन्ही बाजूलाही पान टपऱ्या, चहा कॅन्टीन, मटण विक्रीची दुकाने फोफावली आहेत. काही लोकांनी सव्र्व्हिस रोडवर पक्की बांधकामे केली आहेत. तर काही लोकांनी या सर्व्हिस रोडवर दुकाने चालविण्यास देऊन भाडेवसुली सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेने तत्काळ या मार्गावरील अतिक्रमणे हटवावीत आणि वाहतुकीला होणारा अडथळा दूर करावा, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे