दहा वर्षांत देशाला काय-काय मिळाले?

पंतप्रधान मोदींनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहिलेय, राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालेय. यानंतर आता भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर एक पोस्ट करण्यात आली आहे. विकसित भारत नावाने ही पोस्ट असून यामध्ये २०१४ ते २०२४ या कालावधीत प्रगतीचा आणि कामांचा आलेख मांडला गेलाय. यामध्ये भाजप- महाराष्ट्रने मागील दहा वर्षांत देशाला नेमकं काय मिळालं, याचा दावा केलाय. तर अनेकांनी भाजपच्या या पोस्टचं समर्थन देखील केलंय. अनेकांनी प्रगती अन् विकास झाल्याचं म्हटलंय, तर आणखी एकाने विरोधकांच्या मते विकसित भारत म्हणजे ५० रूपयाला पेट्रोल, २०० रूपये गॅस आणि सगळ्या वस्तू स्वस्त. अर्धवट लोकांना सरकारी नोकरी असे म्हणत विरोधकांवर निशाणा साधलाय. या पोस्टमध्ये नक्की काय? या पोस्टमध्ये म्हटले आहे की, देशभरात २०१४ मध्ये ७४ विमानतळं होती, ती २०२४ अखेर १५७ झाली आहे. २०१४ मध्ये ३८७ वैद्यकीय महाविद्यालये होती, २०२४ पर्यंत ती संख्या ७८० पर्यंत पोहोचली आहे. मेट्रो रेल्वेचा विस्तार २०१४ मध्ये २२९ किमी होता, तो २०२४ अखेरपर्यंत तो ९९३ पोहोचला. MBBSच्या जागा २०१४च्या सुरूवातीला ५१,३४८ जागा होत्या, त्या २०२४ अखेरपर्यंत त्या जागा १,१८,१३७ आहेत. LPG गॅस कनेक्शन २०१४ च्या सुरूवातीला १४.५ कोटी होते, ते २०२४ च्या अखेरपर्यंत ३२.८४ कोटी झाल्या आहेत. पुरातन वस्तूची पुनः प्राप्ती २०१४ च्या सुरुवातीला १३ वर होती, ती संख्या २०२४ च्या अखेरीस २०८० पर्यंत गेलीय. २०१४ च्या सुरूवातीला ५ शहरांमध्ये मेट्रो रेल्वे होत्या, २०२४ अखेरीस २३ शहरांमध्ये मेट्रो रेल्वे आहेत. इंटरनेट कनेक्शन २०१४ च्या सुरूवातीला २५.१५ कोटी होतं, ते आता २०२४ अखेर ९६.९६ कोटी आहे. या पोस्टवर काही नागरिकांनी शेतकऱ्यांचं काय? अशी कमेंट केलीय. तर एकाने महागाई, खासगीकरण, शेतकऱ्यांसाठी काय बदल झाला? उद्योगधंदे काय वाढले, ते सांगितले नाही अशी कमेंट केलीय. तर दुसऱ्या एकाने टॅक्स किती वाढला ते पण सांगा असं म्हटलंय. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवा, त्यांच्यासाठी काहीच केलं नाही सरकारने असे देखील एकाने कमेंटमध्ये म्हटलंय.

सोलापूरची विमानसेवा अजून सुरू का झाली नाही? असा देखील सवाल विचारला गेलाय. तर आणखी एकाने तुमच्या या सर्वांमध्ये सर्वसामान्य लोकांसाठी विकास कुठेच दिसत नाही. सर्वसामान्यांसाठी विकास नाही, असे म्हटले आहे. अनेकांनी कमेंट करून शेतमालाचे भाव सांगा, असे म्हटले आहे. महागाई दाखवा, शेतकऱ्यांचं काय? अदानीला किती विकले? तर दुसऱ्या एकाने महटलंय की, २०१४ च्या अगोदर सर्व वस्तू स्वस्त होत्या. २०२४ ला चारपट महाग झाल्या आहे. हा विकसित भारत केला भाजप महायुतीने, अशी कमेंट केलीय. आणखी एकाने कमेंट केली आहे की, २०१४ ला देशावरील कर्ज ५५ लाख कोटी होतं. २०२४ मध्ये २.२० लाख कोटी आणि खासगीकरण १.१० कोटी असे एकूण ३.३० कोटी कुठे गेले? अशी विचारणा केली आहे.