मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; रायगड–पेण ग्रोथ सेंटर उभारणीसाठी महत्त्वाचा करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र
शिष्टमंडळाने दावोस येथील World Economic Forum (WEF) 2026 मध्ये गुंतवणुकीचा वेग
कायम ठेवत दुसऱ्या दिवशी मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारने रायगड–पेण ग्रोथ
सेंटर उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचा सामंजस्य करार केला असून, येत्या काही महिन्यांत या परिसरात एक भव्य औद्योगिक प्रकल्प आकाराला येणार
आहे. पहिल्याच दिवशी १९ कंपन्यांसोबत तब्बल १४.५ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले
असून, यातून १५ लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण
होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रायगड–पेण ग्रोथ सेंटरचा प्रस्ताव
मंजूर झाल्याने महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञान आणि ज्ञान भारतात येणार – मुख्यमंत्री या कराराबाबत
माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात केवळ मोठ्या
प्रमाणावर गुंतवणूकच येणार नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान आणि
जागतिक पातळीवरील ज्ञानसंपदा भारतात येईल. यामुळे राज्यातील औद्योगिक आणि शहरी
विकासाला नवी दिशा मिळेल.”
मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे मुद्दे
- महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योग उभारण्यासाठी
पूरक वातावरण तयार होईल.
- दावोसमधील करारांमुळे शहरी नियोजनाची क्षमता वाढणार
आहे.
- आगामी काळात दळणवळण आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी
सुधारणा होईल.
जागतिक कंपन्यांचा सहभाग
रायगड–पेण ग्रोथ सेंटर प्रकल्पात अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग
असून, मुख्यमंत्री
फडणवीस यांनी परिषदेत त्यांची नावे जाहीर केली. त्यामध्ये –
- रिपब्लिक ऑफ कोरिया: हनवा ग्रूप
- स्वित्झर्लंड: एसएसबी कंपनी
- अमेरिका: फेडेक्स
- फिनलँड: रिव्हर रिसायकल
- दुबई: एमजीएसए
- सिंगापूर: मेपल ट्री
- भारत: ट्रिबेका डेव्हलपर्स
गुंतवणुकीत यंदा नवा उच्चांक अपेक्षित
दावोस येथील WEF परिषद १९ ते २३ जानेवारी दरम्यान पाच दिवस चालणार
आहे. पुढील दिवसांत आणखी महत्त्वाचे करार होतील, अशी शक्यता
वर्तवली जात आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक गुंतवणूक आकर्षित होईल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी, “महाराष्ट्र हे भारतासाठी विदेशी गुंतवणुकीचे गेटवे बनले आहे,” असे ठामपणे सांगितले.