चैत्री यात्रेसाठी चंद्रभागा नदीपात्रात सोडले पाणी

पंढरपूर, दि. ६-

चैत्री यात्रेसाठी नगरपरिषदेच्या बंधाऱ्यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची चंद्रभागा स्नानाची सोय झाली आहे. 

चैत्र शुध्द एकादशी ८ एप्रिल रोजी असून यात्रा कालावधी २ ते १२ एप्रिल असा आहे. या कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. वारकऱ्यांसाठी चंद्रभागेचे स्नान पवित्र मानले जाते. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक चंद्रभागा स्नान करतात. तसेच चैत्र महिन्यात शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या यात्रेसाठी जाणाऱ्या कावडींना चंद्रभागा स्नानासाठी स्नानासाठी पंढरपूरला आणले जाते. 

सध्या तीव्र उन्हामुळे चंद्रभागा नदीचे पात्र अनेक ठिकाणी कोरडे पडले होते. तसेच जे तुटपुंजे पाणी पात्रात होते यावर शेवाळे दिसत होते. यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी होत होती. उजनी धरणातून सोलापूरसह भीमा नदीकाठच्या पाणी योजनांसाठी ९ एप्रिल दरम्यान पाणी सोडले जाणार आहे. तत्पूर्वी पंढरपूरची चैत्र यात्रा होत असून यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पंढरपूर नगरपरिषदेने आपल्या बंधाऱ्यातून अडीचशे क्युसेक वेगाने पाणी सोडले आहे. 

चंद्रभागा नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने व जास्त काळ पाणी साठून राहिल्याने पाण्यावर शेवाळे येऊन ते घाण झाले होते. नदीपात्रातील हे शेवाळे व घाण पाणी वाहून जावे यासाठी पिराची कुरोली येथील बंधाऱ्यातून गुरसाळे बंधाऱ्यात व गुरसाळे बंधाऱ्यातून दगडी 

पुलाशेजारी असलेल्या बंधाऱ्यात आणून ते चंद्रभागा नदीपात्रात २५० क्युसेक्सने सोडण्यात आले आहे. 

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी कार्यकारी अभियंता भीमा पाटबंधारे विभाग व पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून हे पाणी चंद्रभागा नदी पात्रामध्ये सोडण्याचे आदेश दिले आहेत.