वारीस पठाण यांचा नितेश राणेंना इशारा — “दोन पायांवर येशील, पण जाताना स्ट्रेचरवरून जाशील”

अहिल्यानगर, 10 ऑक्टोबर 2025 —
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत काल (9 ऑक्टोबर) अहिल्यानगरच्या सी.आय.व्ही. ग्राउंडवर झालेल्या जाहीर सभेत AIMIM नेते वारीस पठाण यांनी भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर थेट इशाराच दिला. पठाण म्हणाले, “एक नेपाळी म्हणतो की मुस्लिमांना मशिदीत घुसून मारू, पण तू दोन पायांवर येशील तर जाताना स्ट्रेचरवरून जाशील,” असा कठोर इशारा त्यांनी दिला. त्यांनी पुढे म्हटलं, “भाजपचे एकच काम आहे, ते म्हणजे द्वेष पसरवणे. आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून काम करत आहोत, तरीही आमच्या लोकांना अटक केली जाते. विकासावर बोलण्यात यांच्याकडे काहीच नाही.” पठाण यांनी यावेळी काँग्रेसवरही टीका केली. “70 वर्ष सत्तेत राहूनही त्यांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही. महाविकास आघाडीने एका मुस्लिमालाही उमेदवारी दिली नाही. मग भविष्यात आम्हाला काय देणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.m सभेत माजी खासदार इम्तियाज जलील यांनीदेखील भाषण करत भाजप आणि महायुतीच्या नेत्यांवर टीका केली. त्यांनी नितेश राणेंचा ‘छोटासा चिंटू’ तर संग्राम जगताप यांचा ‘चिकनी चमेली’ असा उल्लेख करत दोघांवर वैयक्तिक हल्ला चढवला.

या सभेनंतर पठाण यांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. विरोधकांनी हे वक्तव्य उचलून धरत AIMIM वर संताप व्यक्त केला आहे.