वाल्मिक कराड एन्काउंटरसाठी ५ ते ५० कोटींची ऑफर होती; निलंबित पोलिस निरीक्षक रणजित कासले यांचा खळबळजनक आरोप

बीड | ११ एप्रिल : वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरसाठी ५ ते ५० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा खळबळजनक आरोप निलंबित पोलिस निरीक्षक रणजित कासले यांनी केला आहे. यासंदर्भातील त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे पोलिस यंत्रणेत खळबळ माजली आहे. रणजित कासले हे बीडमधील सायबर विभागात कार्यरत असताना निलंबित करण्यात आले होते. निलंबनानंतर त्यांनी सातत्याने सोशल मीडियावर गंभीर आरोप व दावे करण्यास सुरुवात केली होती. मात्र, आता त्यांनी वाल्मिक कराडच्या कथित एन्काउंटरबाबत थेट ऑफर दिल्याचा आरोप केल्याने प्रकरण अधिक गहिरं झालं आहे. व्हिडिओद्वारे उघड केला गौप्यस्फोटकासले यांनी व्हिडिओमध्ये म्हटले की, "मला सुरुवातीला ५ कोटी, मग १० कोटी आणि नंतर थेट ५० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती." त्यांच्या या वक्तव्यानंतर पोलिस यंत्रणेतील अंतर्गत व्यवहार आणि संभाव्य राजकीय हस्तक्षेपाबाबत चर्चा सुरू झाली आहे. पूर्वीही झाला होता व्हिडिओ व्हायरल काही दिवसांपूर्वीच कासले यांचा एक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये ते गुजरातमध्ये कथितरित्या एक कोटी रुपयांची मागणी करताना दिसत होते. या दृश्यांमध्ये बंदूक दाखवून दहशत निर्माण करत असल्याचेही स्पष्ट दिसत होते.गुंतागुंतीचे राजकारण आणि चौकशीची मागणी या नवीन आरोपांमुळे प्रकरण अधिक गूढ बनले असून, केंद्र व राज्य पातळीवरून स्वतंत्र चौकशीची मागणी केली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे. रणजित कासले यांचे आरोप खरे असल्यास, हे प्रकरण महाराष्ट्रातील पोलिस आणि राजकारण यातील धक्कादायक संबंध उघड करणारे ठरू शकते.