विराट कोहली १२ वर्षांनंतर खेळणार रणजी दिल्ली संघात निवड

दिल्ली: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली रणजी
ट्रॉफीमध्ये रेल्वेविरुद्ध दिल्ली संघाकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याला
दिल्लीच्या संघातही स्थान मिळाले असून तो आता रेल्वेविरुद्ध सामना खेळणार आहे.
सामन्यासाठी दिल्लीची कमान युवा आयुष बडोनीकडे सोपवण्यात आली आहे. कोहली शेवटचा
रणजी ट्रॉफी २०१२ मध्ये खेळला होता. त्यानंतर तो गाझियाबादच्या मोहन नगरमध्ये
उत्तर प्रदेशविरुद्ध रणजी सामना खेळला. त्या सामन्यात तो वीरेंद्र सेहवागच्या
नेतृत्वाखाली खेळला होता. आता रेल्वेविरुद्धच्या सामन्यात तो आयुष बडोनीच्या
नेतृत्वाखाली खेळणार आहे. जेव्हा विराट कोहली शेवटचा रणजी सामना खेळला होता.
तेव्हा तो भारतीय क्रिकेटचा उगवता तारा होता पण आता तो सध्याच्या खेळातील सर्वात
मोठ्या दिग्गजांपैकी एक आहे. या माजी भारतीय कर्णधाराच्या नावावर आता ८१
आंतरराष्ट्रीय शतके आहेत. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन या सुपरस्टारच्या
घरी परतण्यासाठी सर्व व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी तयारी करत आहे. डीडीसीएचे
सचिव अशोक शर्मा यांना सामन्याच्या व्यवस्थेबद्दल विचारले असता ते म्हणाले की," विराटच्या उपस्थितीने सामन्याचे महत्त्व लक्षणीय वाढेल. नियमित रणजी
सामन्यासाठी आमच्याकडे १० ते १२ वैयक्तिक सुरक्षा कर्मचारी आहेत, पण विराटच्या सरावात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून आम्ही सुरक्षा नक्कीच
वाढवू. आम्ही दिल्ली पोलिसांनाही सामन्याची माहिती दिली आहे." चाहत्यांसाठी
रणजी सामने मोफत पाहण्याची व्यवस्था आहे. मात्र, या
सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार नाही ज्यामुळे कोहलीच्या चाहत्यांची नक्कीच निराशा
होईल. असा आहे दिल्ली संघ आयुष बडोनी (कर्णधार), विराट कोहली,
प्रणव राजवंशी (यष्टीरक्षक), सनत संगवान,
अर्पित राणा, मयंक गुसैन, शिवम शर्मा, सुमित माथूर, वंश
बेदी (यष्टीरक्षक), मणि ग्रेवाल, हर्ष
त्यागी, सिद्धांत शर्मा, नवदीप सैनी,
यश धुल , गगन वत्स, जॉन्टी
सिद्धू, हिम्मत सिंग, वैभव कंदपाल,
राहुल गेहलोत, जितेश सिंग