नेपाळमध्ये उग्र आंदोलन: संसद भवनाला आग, अर्थमंत्र्यांवर हल्ला; पंतप्रधान केपी शर्मा ओलींचा राजीनामा

काठमांडू | ९ सप्टेंबर २०२५
नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झालेलं जनआंदोलन आता भीषण स्वरूप धारण करत आहे. निदर्शकांनी उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री बिष्णू प्रसाद पौडेल यांना काठमांडूमध्ये घेरून मारहाण केली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, देशातील वाढत्या आंदोलन आणि हिंसाचारामुळे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी लष्करप्रमुख अशोक सिंघल यांच्याशी चर्चेनंतर राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लष्करानेच ओली यांच्यावर पद सोडण्याचा दबाव आणला.

 संसद भवनाला आग
निदर्शकांनी संसद भवनात घुसून तोडफोड केली आणि मोठी आग लावली. इमारतीतून धुराचे प्रचंड लोट बाहेर पडताना दिसले. याशिवाय, निदर्शकांनी अनेक मंत्र्यांच्या घरांनाही आग लावली आहे.

 नेपाळमध्ये तणावपूर्ण वातावरण
सध्या संपूर्ण नेपाळमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. मंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानांमध्ये सैन्य सुरक्षा पुरवली जात असून, हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. अनेक ठिकाणी निदर्शकांकडून जाळपोळ आणि हल्ले होत असल्याची माहिती समोर आली आहे.