गाव विक्रीसाठी बाजारात; रस्ते, पाणी, आरोग्य आणि शिक्षणाचा प्रश्न कायम,गावकऱ्यांचा संतप्त निर्णय
.jpeg)
आष्टी : वनवेवाडी (ता. आष्टी, जि. बीड) येथील ग्रामस्थांनी गाव विक्रीसाठी काढण्याचा टोकाचा
निर्णय घेतला असून, शासनाच्या मूलभूत सुविधांकडे होणाऱ्या सातत्यपूर्ण
दुर्लक्षामुळे हे पाऊल उचलल्याचे त्यांनी स्पष्ट
केले आहे. ग्रामस्थांनी आपल्या संतापाचा
जोरदार उद्रेक करत "बोंबल्या आंदोलन" उभारले. या अनोख्या आंदोलनात त्यांनी गावातील रस्त्यांवर असलेल्या खड्यांचे प्रतीकात्मक
वर्षश्राद्ध घालून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. ढोल, ताशा, हळद-कुंकू, आणि हार-फुले अशा पारंपरिक विधींनी खड्ड्यांचे अंतिम
संस्कार करत सरकारच्या भूमिकेवर टीका करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण अशा मूलभूत
गरजांकडे शासनाचे दुर्लक्ष सुरूच आहे. परिणामी, गावकऱ्यांचे जीवनमान खालावले असून, दैनंदिन जीवनात गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. “आम्ही शेतकरी आहोत, कर भरतो, पण तरीही ना रस्ता मिळतो ना पाणी!
आता आमच्याकडे गाव विकण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही,” असे संतप्त ग्रामस्थ म्हणाले. ग्रामस्थांनी शासनाला इशारा दिला आहे की, जर तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. शासनाने याची तातडीने दखल घेऊन गावकऱ्यांच्या मागण्या मान्य
कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.