विजयपूर : जिल्हा पोलिसांकडून रु. ७ कोटींपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता हस्तगत, संबंधितांना परत*

विजयपूर जिल्ह्यात 2024-25 या आर्थिक वर्षात, जिल्ह्यातील
विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 225 मालमत्ता
चोरीच्या प्रकरणांमध्ये एकूण 345 आरोपींना अटक करण्यात आली
असून, त्यांच्याकडून सुमारे 7 कोटींपेक्षा
अधिक किमतीच्या मालमत्ता हस्तगत करण्यात आल्या. या वस्तू संबंधितांना परत करण्यात
जिल्हा पोलिस यशस्वी ठरले आहेत. शुक्रवारी जिल्हा पोलिसांच्या वतीने विजयपूर
शहरातील जिल्हा पोलिस परेड मैदानावर आयोजित 'प्रॉपर्टी
रिटर्न परेड' मध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी
यांच्या नेतृत्वाखाली चोऱ्यांमध्ये गमावलेले सोनं व इतर वस्तू वारसांना परत
करण्यात आल्या.
सोने चोरी
प्रकरणे : गेल्या एका वर्षात जिल्ह्यात 97 सोनं चोरीच्या प्रकरणांमध्ये 152 आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण 5145.02
ग्रॅम सोनं व 1723 ग्रॅम चांदीचे दागिने,
एकूण किंमत ₹2,39,85,110 इतकी मालमत्ता हस्तगत
करण्यात आली आहे. वाहन चोरी प्रकरणे : जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत
दाखल 73 दुचाकी चोरी प्रकरणांत 102 आरोपींना
अटक करून 251 दुचाकी (किंमत ₹1,06,72,000) हस्तगत करण्यात आल्या. चारचाकी चोरीच्या 14 प्रकरणांत
19 आरोपींना अटक करून 12 चारचाकी वाहने
(किंमत ₹1,32,41,000) जप्त करण्यात आली. टिप्पर चोरीच्या
प्रकरणांत 5 आरोपींना अटक करून 2 टिप्पर
(किंमत ₹19,00,000) पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
रोख व इतर चोरी
प्रकरणे : जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल 19 रोख
चोरीच्या प्रकरणांतून 31 आरोपींना अटक करून ₹1,91,89,404
रोख हस्तगत करण्यात आली आहे. इतर 21 चोरीच्या
प्रकरणांतून 36 आरोपींना अटक करून 143 वस्तू,
एकूण किंमत ₹12,42,250, हस्तगत करण्यात आली. एकूण
₹7,02,29,764 किमतीच्या जप्त मालमत्तांपैकी ₹3,46,08,100
किमतीची मालमत्ता वारसांना परत करण्यात आली असून, उर्वरित ₹3,56,21,664 किमतीच्या वस्तू न्यायालयाच्या
परवानगीने लवकरच वारसांना परत करण्यात येतील, अशी माहिती
एसपी लक्ष्मण निंबरगी यांनी दिली. या कार्यक्रमास अॅडिशनल एसपी शंकर मारीहाल,
रामनगौड हत्ती, डीवायएसपी बसवराज यलिगार,
बळप्पा नंदगावी, सुनील कांबळे, तुळजाप्पा सुल्फी, एच.एस. जगदीश व विविध पोलिस
ठाण्यांचे सीपीआय, पीआय, पीएसआय व
कर्मचारी उपस्थित होते.
महत्वाची
सूचना : पोलिस विभाग सर्व प्रकारच्या जनसेवेसाठी सदैव
तत्पर आहे. जनतेने आपल्या घरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. सीसीटीव्ही
असल्यास चोरीचे प्रकार शोधणे सुलभ होते. प्रत्येक घर, रस्ता,
गल्ली, गावांमध्ये सीसीटीव्ही आणि वाहनांमध्ये
GPS टूल बसवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फसवणुकीच्या
प्रकरणात लोभ व हव्यास हे मुख्य कारण असल्याने नागरिकांनी सावध राहावे. गुन्हेगारी
रोखण्यासाठी पोलिस विभागासोबत नागरिकांनी सहकार्य करावे, असे
आवाहन जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी केले.