विजयाबाई सूर्यवंशी म्हणाल्या – “आमचा विश्वास बाळासाहेब आंबेडकरांवर”

औरंगाबाद, २९ एप्रिल २०२५सोमनाथ सूर्यवंशी याच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दुसरी सुनावणी पार पडली. यामध्ये महत्त्वाचा वळण देणारा निर्णय देताना न्यायालयाने सरकारने नेमलेल्या तपास अधिकाऱ्याच्या कामावर तातडीने स्थगिती दिली आहे. या सुनावणीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, तपास अधिकारी २ आरोपींना चौकशीसाठी नोटीस देत असून, त्यांनी "नेमकं काय बोलायचं" हेही सूचित केले आहे. ही बाब गंभीर असून तपास प्रक्रियेत निष्पक्षतेचा अभाव आहे आणि चौकशी दबावाखाली होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. न्यायालयाने हे मुद्दे गांभीर्याने घेत चौकशी अधिकाऱ्याला कुठलाही निर्णय घेण्यास किंवा चौकशी अहवाल सादर करण्यास मनाई केली आहे. या कारवाईमुळे चौकशीची दिशा बदलण्याची शक्यता आहे.

SIT स्थापन होणार का?

प्रकरणात पुढील सुनावणी ८ मे रोजी होणार आहे. यावेळी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यास काय पावले उचलावीत? आणि SIT स्थापन करावी का? याबाबतही चर्चा होणार असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले.

चौकशीमध्ये दिशाभूल – आंबेडकरांचा आरोप

आंबेडकर यांनी आरोप केला की, सरकारी तपास श्वासोच्छवासाच्या समस्येमुळे मृत्यू झाला, या दिशेने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे. फॉरेन्सिक पोस्टमार्टम अहवालाच्या विरोधात हा तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

"बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर आमचा विश्वास" – विजयाबाई सूर्यवंशी

"मला कायद्यातलं फारसं समजत नाही, पण बाळासाहेब आंबेडकर जे करत आहेत ते योग्यच आहे," असे भावनिक उद्गार सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. "आम्हाला न्यायालयाकडून न्यायाचीच अपेक्षा आहे," असेही त्या म्हणाल्या.