ज्येष्ठ सॅक्सोफोन वादक इक्बाल दरबार यांचे निधन

पुणे – ऑर्केस्ट्रा विश्वाला आपल्या संगीताने वेगळा ठसा उमठवणारे
ज्येष्ठ सॅक्सोफोन वादक इक्बाल दरबार (वय ७७) यांचे शनिवारी (दि.28) निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले
आणि एक मुलगी असा परिवार आहे. महाराष्ट्रात ऑर्केस्ट्राची संकल्पना रुजवणाऱ्या
मोजक्या कलावंतांमध्ये दरबार यांचा मोठा मान होता. त्यांचे वादन केवळ
पुणे-मुंबईपुरते मर्यादित राहिले नाही, तर बॉलिवूडमधील अनेक
दिग्गज कलाकारही त्यांच्या सॅक्सोफोनच्या सुरांनी मंत्रमुग्ध होत असत. पुणे
महानगरपालिकेत आयोजित दिलीपकुमार यांच्या सत्कार सोहळ्यात त्यांनी ‘मधुबन में
राधिका नाचे रे’ हे गीत सादर केले होते. त्यांच्या त्या सादरीकरणाने खुद्द
दिलीपकुमार इतके प्रभावित झाले की त्यांनी उभे राहून दाद दिली आणि वन्स मोअरची
मागणी केली होती. संगीतासोबतच सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि
सेवाभाव हीच त्यांची खरी ओळख होती. दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या
विसर्जन मिरवणुकीची सुरुवात दरबार बँडच्या आरतीने होत असे. त्यांनी सीमेवर जाऊन
जवानांसाठी सादरीकरण केले आणि मिळालेला निधी कृतज्ञता निधी म्हणून सैन्याला दिला. त्यांनी
स्थापन केलेल्या ‘मोहम्मद रफी आर्ट फाउंडेशन’च्या माध्यमातून गरजू कलाकारांना
वैद्यकीय आणि आर्थिक मदतीचे हात पुढे केले. भोई प्रतिष्ठानमध्ये समन्वयक म्हणूनही
ते कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने संगीत आणि समाजकार्य क्षेत्राला मोठी हानी
झाली आहे.