जेलमध्ये असूनही वाल्मीक कराडची दहशत कायम पोलीस अधिकारी गोल्डे यांचा जबाब

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्याबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) विश्वांभर गोल्डे यांच्या जबाबातून उघड झालं आहे की, वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असला तरी त्याच्या
कार्यकर्त्यांची दहशत अद्यापही कायम आहे. विशेष म्हणजे, वाल्मिक कराड हा गुंड असल्याची माहिती असतानाही
बीड पोलिसांनी त्याला दोन कर्मचाऱ्यांचे संरक्षण दिले होते. हा प्रकार आता उघड झाल्यामुळे बीड पोलिस दल नव्या वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एसआयटी व सीआयडीचा तपास राज्य सरकारने या हत्येप्रकरणाची गंभीर दखल घेत विशेष तपास पथक (SIT) आणि सीआयडीच्या माध्यमातून तपास सुरू केला. यावेळी सीआयडीचे उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी २३ फेब्रुवारी २०२५ रोजी SDPO विश्वांभर गोल्डे यांचा जबाब नोंदवून घेतला. याच जबाबातील तपशील आता उघड झाला असून त्यात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुंड असूनही सरकारी सुरक्षा! गोल्डे यांच्या जबाबानुसार, वाल्मिक कराडच्या अटकेनंतर बीड शहर पोलिस
ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र, त्याची दहशत असल्याचे कारण देत १८ अंमलदार आणि दोन RCP प्लाटून त्याच्या परिसरात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात
आले. तसेच २२ जानेवारी रोजी न्यायालयात हजर करताना ६
अधिकारी, ३३ पुरुष आणि ६ महिला कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. B आत्मसमर्पण, नंतर खंडणी प्रकरण, मग खून वाल्मिक कराडने ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यात सीआयडीसमोर आत्मसमर्पण केले होते. त्यावेळी पोलिसांनी त्याला खंडणी प्रकरणात अटक केल्याचे सांगितले होते. मात्र, गोल्डे यांच्या म्हणण्यानुसार, त्याच्यावर सर्वप्रथम संतोष देशमुख यांच्या अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल
करण्यात आला होता. या नव्या खुलाशांमुळे बीड पोलिस दलावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकरणाचा राजकीय आणि प्रशासनिक पातळीवर नवा वाद निर्माण
होण्याची शक्यता आहे.