वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण:नेपाळ सीमेवरून निलेश चव्हाणला अटक

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला अखेर
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळ सीमेवरून अटक केली आहे. तो गेल्या आठवड्याभरापासून
फरार होता आणि वैष्णवीच्या कुटुंबीयांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याच्या
आरोपाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल होता.
काय आहे प्रकरण?
१६ मे रोजी वैष्णवी हगवणे (२४) हिने भुकूम येथील
सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्यावर सासरच्यांकडून झालेल्या शारीरिक व
मानसिक छळामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पती शशांक, सासू लता, दीर सुषील, जाऊ करिश्मा आणि माजी राष्ट्रवादी काँग्रेस नेते व सासरे राजेंद्र हगवणे यांना
याआधीच अटक झाली आहे.
निलेश चव्हाणची भूमिका काय?
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या दहा महिन्यांच्या
बाळाचा ताबा निलेश चव्हाणकडे होता. वैष्णवीचे कुटुंबीय बाळाला घेण्यासाठी गेले
असता, चव्हाणने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावले. याप्रकरणी २२
मे रोजी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर,
२४ मे रोजी बावधन पोलीस ठाण्यात दाखल आत्महत्या प्रकरणात चव्हाणला
सहआरोपी करण्यात आले. त्याच्यावर बाळाची हेळसांड, धमकी देणे
आणि गुन्हेगारी दबाव निर्माण केल्याचे आरोप आहेत.
कशी झाली अटक?
पिंपरी-चिंचवड आणि पुणे पोलिसांची एकूण सात पथके
चव्हाणचा शोध घेत होती. शेवटी, तो नेपाळच्या सीमेवर लपून
बसल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी (३० मे) त्याला अटक केली. त्याच्या
मालमत्तेची जप्ती प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्यावर स्थायी
वॉरंट जारी केले होते.