बंद शिवशाही बसचा लॉज सारखा वापर ; स्वारगेटवरील समध्ये कंडोम, साड्या, शर्ट, चादरी

पुणे: पुण्यात भल्यापहाटे स्वारगेट एसटी आगारात बलात्कार घडला. एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. आरोपी तरुणानं गोड बोलून पीडितेला फूस लावली. फलटणला निघालेल्या तरुणीला त्यानं शिवशाही बसमध्ये नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव आहे. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. कायम वर्दळ असलेल्या स्वारगेट एसटी आगार परिसरात तरुणीवर बलात्कार झाल्यानं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. आगारात बंद असलेल्या शिवशाही बसेस उभ्या आहेत. त्या बसमध्ये ब्लँकेट्स, शर्ट, साड्या, अंतर्वस्त्रं आढळली आहेत. याच बसमध्ये वापरलेले कंडोम, त्यांची पाकिटंही सापडली आहेत. या बंद बसेसचा वापर लॉज सारखा केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचे गंभीर पडसाद उमटले असून  शिवसेना ठाकरे गटाने स्वारगेट स्टॅण्डवरील सुरक्षा दालन आणि बंद बसची तोफोड केली. स्वारगेट एसटी आगार परिसरात कायम वर्दळ असते. त्यामुळे या भागात एका बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाला आणि त्याची कुणकुण कोणालाच लागली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आगारात अत्याचार झाल्याची माहिती आगार प्रमुखांनादेखील नव्हती. पीडितेनं पोलिसांकडे तक्रार दिली. मग पोलीस आगारात तपासासाठी पोहोचले. तेव्हा आगार प्रमुखांना घडलेला प्रकार समजला. पहाटे साडे पाच वाजता २६ वर्षांची पीडित तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात आल्यानंतर ती एका बाकड्यावर बसली होती. याच वेळी आरोपी त्या ठिकाणी आला. आरोपीनं पीडितेला विचारलं, ताई तू कुठे चालली आहेस?. त्यावर पीडितेनं सांगितलं मी फलटणला निघाली आहे. त्यावर आरोपी म्हणाला फलटणची बस तर तिकडे लागली आहेस. तू इथे काय करतेस? नंतर तरुणी म्हणाली साताऱ्याला जाणाऱ्या बस इथेच लागतात. त्यावर आरोपी म्हणाला, ती बस रात्रीची लेट झाली आहे. तू जा पटकन मी तुला बसवतो, असं म्हणून आरोपी दत्तात्रय गाडे हा तरुणीला शिवशाही बस क्रमांक MH 06 BW 0319 मध्ये घेऊन गेला. गाडीमध्ये पूर्ण अंधार होता, त्यानंतर पीडितेला संशय आला. हे पाहताच आरोपी गाडे पीडितेला म्हणाला रात्री उशीर झाला आहे. त्यामुळे प्रवासी झोपलेले असतील म्हणून लाईट बंद केले आहेत. तू वर चढ आणि टॉर्च लावून पाहा असं गोड बोलून आरोपी गाडे हा पीडितेला बसमध्ये घेऊन गेला आणि पाठोपाठ तोही त्या गाडीमध्ये चढला. बसमध्ये चढताच गाडेने दरवाजा लावून घेतला आणि पीडितेसोबत अतिप्रसंग केला आणि पसार झाला. या घटनेची गंभीर दखल राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी स्वारगटे बस डेपोत कार्यरत असलेल्या सर्व 23 सुरक्षा रक्षकांचे तात्काळ निलंबन केलं आहे. उद्यापासून नवे सुरक्षा रक्षक नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच डेपो मॅनेजर, वाहतूक नियंत्रक यांच्यावरही आगामी काळात कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.  या घहटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही. मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत.” असं अजित पवार म्हणाले आहेत.