पहलगाम हल्ल्याचा अमेरिकेकडून निषेध

वाशिंग्टन : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रूथ ’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या हल्ल्याबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्याचा अमेरिकेने निषेध केला आहे.  काश्मीरमधून अत्यंत दु:खद अशी बातमी समोर आली आहे. दहशतवादाविरोधातील या लढाईमध्ये अमेरिका भारतासोबत ठामपणे उभी आहे. मृतांच्या आत्म्याला शांती मिळो आणि जखमी नागरिक लवकर बरे होवोत, अशी आम्ही प्रार्थना करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील जनतेप्रती आम्हाला मनापासून सहानुभूती आहे.” दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील हा हल्ला दहशतवादी असल्याचे स्पष्ट केले असून, "हल्ला करणाऱ्यांना सोडले जाणार नाही," असा इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “अलीकडच्या वर्षांमध्ये सामान्य पर्यटकांवर करण्यात आलेला हा सर्वांत मोठा आणि धक्कादायक हल्ला आहे.” या हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी झाले असून, सध्या त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून, सुरक्षा यंत्रणांना अलर्ट ठेवण्यात आले आहे.