भारतीय सॉफ्टवेअर कर्मचारी भरतीत 18-20% घट, सॉफ्टवेअर निर्यातदार कंपन्यांमध्ये 'वेट अँड वॉच' धोरण

नवी दिल्ली अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक अनिश्चिततेचा फटका आता भारतीय IT कंपन्यांनाही बसू लागला आहे. जवळपास 280 अब्ज डॉलर्सच्या उलाढालीचा भारतीय सॉफ्टवेअर निर्यात उद्योग सध्या वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असून, नवीन भरती प्रक्रियेला ब्रेक लागलेला आहे. जानेवारी ते मार्च 2025 या तिमाहीत, आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांची मागणी 18-20% ने घटली असल्याची माहिती भरती क्षेत्रातील कंपन्यांनी दिली आहे. 2024 च्या अखेरीस जिथे भरतीसाठी सकारात्मक वातावरण होतं, तिथे आता अचानक घसरण दिसून येत आहे.

70% कामगार IT सेवांमध्ये, तेच संकटात?
Xpheno चे सह-संस्थापक कमल करंथ यांनी सांगितले की, "भारतीय टेक उद्योगात, विशेषतः IT सेवांमध्ये कर्मचारी कपात होण्याची शक्यता आहे. या विभागात सुमारे 70% भारतीय टेक कामगार कार्यरत आहेत."

कपात टाळणं अशक्य?
Xpheno च्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2025 मध्ये IT सेवांमध्ये 80,000 भरती झाली होती, परंतु मार्चमध्ये ही संख्या 55,000 वर आली. जर अमेरिका-चीन टॅरिफ युद्ध आणखी तीव्र झालं, तर कर्मचारी कपात अटळ असल्याचे संकेत उद्योगातून मिळत आहेत.