उर्दू साहित्यकांनी राष्ट्रवाद मजबूत केला : सरफराज शेख

सोलापूर : परकीय इंग्रजांनी आपल्या देशात "तोडो फोडो " नीतीचा वापर करून देशाची एकात्मतेला मलीन केले, हे सर्व जगजाहीर आहे. प्रत्येक धर्माला आज एकतेची गरज आहे, सर सय्यद अहमद खां व इतर उर्दू साहित्यकारांनी देशात एकात्मता निर्माण करत राष्ट्रवाद मजबूत केला आहे, हे विसरता येत नाही, असं प्रतिपादन पत्रकार तथा समिक्षक सरफराज शेख यांनी केले.  इदार ए इस्लामी हिंद व सोशल महाविद्यालयाच्या वतीने आयोजित बहुभाषिक साहित्य चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदचे सचिव अय्युब नल्लामंदू प्रमुख अतिथी तर चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी पत्रकार, समिक्षक आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक सरफराज शेख होते. या चर्चा सत्रात डॉ. राजेंद्र वडजे, डॉ. देविदास गायकवाड. डॉ. भगवान आदटराव, प्रा. सुभाष शास्त्री यांनी आपल्या विचार व्यक्त करत साहित्याच्या विविध पैलूवर चर्चा करून साहित्य हे समाज प्रबोधनाचे माध्यम आहे, भाषा कोणती ही असो ते समाज जोडण्याचे महत्वाचे काम करत असते, म्हणून यावर अधिक काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. भाषा टिकली पाहिजे, भाषा संपली की संस्कृती संपते, आणि संस्कृती संपली तर आपण कोण ? आपला अस्तिव काय ? असा प्रश्न निर्माण होतो, म्हणून भाषेचे जतन करणे गरजेचे आहे,असेही पत्रकार तथा समिक्षक सरफराज शेख यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना  म्हटले. त्यांनी यावेळी इतिहासाचे अनेक संदर्भ अन् दाखले दिले. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक अय्यूब नल्लामंदू यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले कि, साहित्यकाराचं लिखाण हे एतेहासिक समजलं जाते, म्हणून लिहिताना कोणाचे भावना दुखविण्याचे पाप करू नका. जे कोणी नकारात्मक लिखाण करत असेल तर त्यास प्रेमपूर्वक उत्तर देण्याची आज गरज आहे. प्रेमपूर्वक दिलेल्या उत्तराने गैरसमज दूर होतात, तसेच आपलं अस्तित्व टिकून राहतं, असे मत व्यक्त केले. प्रा. डॉ. शफी चोबदार, शफीक काजी यांनी पाहुण्याचे स्वागत केले. चर्चासत्राचं सूत्रसंचालन व आभार प्रा. रईसा मिर्जा यांनी केले.

यावेळी डॉ. सलीम खान, डॉ. मकबूल अहमद, डॉ. इस्माईल शेख, शफीक काजी, इक्बाल बागबान, वायज सय्यद, मन्नान शेख, नजीर मुन्शी, महेमूद नवाज, हसीब नदाफ, बशीर परवाज, असरार नल्लामंदू, सरदार नदाफ, म. हुसेन बक्षी उपस्थित होते.