वक्फ बोर्ड वरून संसदेत गदारोळ; दोन्ही सभागृह दुपारपर्यंत तहकूब

नवीदिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील
आज गुरुवारी शेवटचा कामकाजाचा दिवस आहे. वक्फ विधेयकावरील
संयुक्त संसदीय समितीचा ( जेपीसी) अहवाल राज्यसभेत सादर करण्यात आला. अहवाल सादर
झाल्यानंतर सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातला. दरम्यान, लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू
झाल्यानंतर मोठा गोंधळ झाला. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत
तहकूब करण्यात आले. दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेसने
संसदेच्या परिसरात निदर्शनेही केली. केरळमधील किनारी आणि वन सीमावर्ती
समुदायांच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी
यांच्यासह काँग्रेस खासदारांनी संसद भवन संकुलात फलक आणि बॅनर घेऊन निषेध केला.
केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेस खासदार प्रियंका गांधी
वाड्रा म्हणाल्या की, वायनाडमध्ये वन्य प्राण्यांनी सात
जणांचा बळी घेतला आहे. ही खूप चिंताजनक परिस्थिती आहे. ही समस्या कमी करण्यासाठी
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने निधी पाठवण्याची गरज आहे. मला आज हा मुद्दा
उपस्थित करण्याची आशा आहे. राज्यसभेत अध्यक्ष धनखड यांच्या परवानगीनंतर, वक्फ दुरुस्ती विधेयकावर स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी)
अहवालही सादर करण्यात आला. अहवाल सादर झाल्यानंतर सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातला.
सभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले. लोकसभेत सदस्यांच्या गोंधळामुळे
सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले.